
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच तिसरा भूकंप होणार?
माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, त्या गोष्टीचा दिला दाखला, बघा काय केला दावा?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री आणि आठ मंत्रीपदे मिळवली. सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघेही राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा करत आहेत.पण हे सर्व सुरु असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या बंडावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीतून बंड करणाऱ्या अजित पवार यांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा नाही. त्यामुळेच त्यांनी आमदारांची परेड किंवा शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्यांच्या गटावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे ३६ आमदार असते, तर त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं असतं. परंतु त्यांच्याकडे तेवढी संख्या नसल्याने त्यांनी आमदारांना हाॅटेलवर ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून बंड करणारे आमदार तसेच मंत्र्यांचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचे भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. तसेच पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्यांचं निलंबन केलंय. मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहेत? हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे. हा फक्त राष्ट्रवादीचा प्रश्न नाहीये. तर हा राज्याचा प्रश्न आहे. राज्यात वैध सरकार आहे की अवैध सरकार आहे हे यावरून ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षांना शिवसेना निलंबनाबाबत १० ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागणार आहे. असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांचे निलंबन हा राज्यातील तिसरा राजकीय भूकंप असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादीचे विधानसभेतील प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील बंडखोर आमदारांवर कारवाईसाठी विधानसभाध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडूनही राष्ट्रवादीच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीतील फूट आणि आमदारांच्या निलंबनावर विधानसभेत मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.