
“फोन सुद्धा उचलत नाहीत…” स्वपक्षाच्या मंत्र्यांवर संतोष बांगर कडाडले; संतोष बांगरांचे वादळी भाषण आणि श्रीकांत शिंदेंचे मौन
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी स्वपक्षातील मंत्र्यांवरच निशाणा साधत एक मोठी राजकीय डरकाळी फोडली आहे. “शिवसेनेचे अनेक मंत्री म्हातारे झाले आहेत, त्यांना बाजूला करून आमच्यासारख्या वाघांना पुढे आणा,” असे जाहीर आवाहन बांगर यांनी पक्षनेतृत्वाला केले आहे. त्यांच्या या स्फोटक भाषणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

“अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकत आहेत!”

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे पार पडलेल्या जाहीर सभेत संतोष बांगर बोलत होते. आपल्या आक्रमक शैलीत बोलताना बांगर यांनी थेट स्वपक्षाच्या मंत्र्यांवर तोफ डागली. ते म्हणाले, “अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकत आहेत. फोन केला तर रिप्लाय सुद्धा देत नाहीत. ते मंत्री पक्षाला कमजोर करण्याचे काम करत आहेत. काहीजण नुसते लोकांमध्ये जातात, परंतु काम करत नाहीत.”

पुढे बोलताना त्यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कौतुक केले, मात्र इतर मंत्र्यांवर ओढलेले आसूड सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. “अनेक मंत्री म्हातारे झाले आहेत, त्यांना ऐकू येत नाही. त्यांना पदावरून बाजूला करा. या शेळ्यांमागे वाघ दडले आहेत, त्यांना पुढे करा; जेणेकरून पुढच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील,” असे बांगर यांनी स्पष्ट केले.
उबाठा खासदारांच्या प्रवेशावर श्रीकांत शिंदेंची मौन बाळगणे पसंत
दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे हे परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे (उबाठा) गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता, श्रीकांत शिंदेंनी थेट उत्तर देणे टाळत या प्रश्नाला बगल दिली. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढवणार असल्याचा दावा त्यांनी केला.

