
‘ते कलाकारांना कुत्र्यासारखं वागवायचे, उद्धट वागत अपमानित करायचे’
तारक मेहता मधील आणखी एका अभिनेत्रीचे खळबळजनक आरोप, मोदींवरही आरोप
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाते. प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करत आले आहेत. पण मागील काही दिवसापासून या मालिकेच्या निर्मात्यावर आरोप केले जात आहेत. आता मालिकेत ‘बावरी’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियानं आता शो चे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्यांविरोधात आवाज उठवला आहे.
मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर कार्यक्रमातून बाहेर पडलेल्या जेनिफर मिस्त्री या अभिनेत्रीनं अनेक गंभीर आरोप केले होते. इतकंच नाही तर तिनं असीत मोदी आणि अन्य दोन निर्मात्यांविरोधात पोलिसांत तक्रार ही दाखल केली आहे. आता अभिनेत्री मोनिका भदोरियानं हिंदुस्थान टाइम्सला एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिनं सेटवरील एकंदरीत परिस्थितीविषयी चर्चा केली. ती म्हणाली की, तिनं हा शो २०१९ मध्येच सोडला होता. तसेच तिने असीत मोदी यांच्यासह सोहेल रामानी यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. ती म्हणाली की, ”मी हा कार्यक्रम सोडला त्यानंतर तिला तीन महिन्यांचे मानधन मिळवण्यासाठी एक वर्ष झगडावं लागलं होतं. ही रक्कम सुमारे चार ते पाच लाख इतकी होती.” तसेच ती म्हणाली की, “तिच्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरू होते. तेव्हा निर्मात्यांनी तिला कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. तिनं सांगितलं की, ‘आईबरोबर मी संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये रहायचे. हे त्यांना माहिती होतं तरी देखील ते मला सेटवर लवकर बोलवायचे. तिथं आल्यानंतर माझ्या चित्रीकरणासाठी वेळ असायचा त्यामुळे मला बसून रहावे लागायचे.’ जेव्हा मोनिका भदोरियाच्या आईचं निधन झालं तेव्हा शो चे निर्माते असित मोदी यांनी तिला सांत्वन देण्यासाठी एक फोनही केला नाही. त्यावर मोनिका म्हणाली,”मी मानसिक तणावात होते पण त्यांनी माझ्या आईच्या निधनानंतर सातव्या दिवशी मला कॉल केला आणि म्हटलं की मला सेटवर लवकर परतावं लागले, जेव्हा मी माझी मानसिक स्थिती ठीक नाही असं सांगितलं तेव्हा त्यांच्या टीमनं मला सांगितलं, आम्ही तुम्हाला पैसे देत आहोत,तेव्हा आम्ही बोलवू तेव्हा तुम्हाला यावं लागेल. मग भले तुमची आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असो की आणखी कुणी. मी सेटवर तेव्हा गेले कारण माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता”. असे आरोप या अभिनेत्रीने केला आहे.
मोनिकानं मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘ अशा वाईट वातावरण असलेल्या ठिकाणी काम करण्यापेक्षा काम न करता बसून राहणं योग्य. इथं प्रत्येकजण उद्धटपणं वागत होतं. सोहल रमानी तर सर्वांशी वाईटच वागायचा.’ पैशांबाबत ते खूप गैरव्यहार करायचे. तो अतिशय उद्धट आहे त्यानं तर नट्टू काकांचा देखील अपमान केला होता.’ असाही दावा भदोरियाने केला आहे.