
‘या बाळासाहेबाची त्या बाळासाहेबांना हात जोडून विनंती आहे’
जेंव्हा झाला होता बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय सामना, बघा काय घडल होत
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा करण्यात आली. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल.असे सांगत ही युती करण्यात आली पण यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा एक राजकीय प्रसंग चांगलाच चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रात १९८७-८८ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या इंग्रजी ग्रंथातील मजकूरावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यात राम आणि कृष्ण यांची चिकित्सा करण्यात आली होती. ही गोष्ट न पडल्यामुळे या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी काही महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटनांनी केली होती. त्यावेळी आंबेडकर प्रेमींनी या ग्रथांचे समर्थन केले तर काही हिंदू संघटनानी या ग्रंथावर आक्षेप घेतला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी या ग्रंथाच्या समर्थनात सुमारे १० लाखांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अतिशय आक्रमक भूमिका घेत ‘सामना’त ‘रिडल्स राम आणि कृष्ण’ प्रश्नावर महाराष्ट्र पेटवू, असा मथळा छापला.त्यावेळी बाळासाहेबांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी होती. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा गदारोळ होण्याची शक्यता होती.ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत गोरगरिबांची घरं जळतील, सामान्य लोक उघड्यावर येतील, तेव्हा आजच्या मोर्चात आक्रमक बोलण्याऐवजी सामंजस्याची भाषा वापरावी, अशी विनंती भावे यांनी प्रकाश आंबेडकर यांना केली. यावेळी नागपूर मध्ये तो मोर्चा काढण्यात आला त्यात बाळासाहेब आंबेडकर काय बोलणार याची उत्सुकता होती. त्यांचे एक वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात कमालीचा तणाव निर्माण करणार होता.पण बाळासाहेब भाषणासाठी उभे राहिले आणि म्हणाले. “बाळासाहेब ठाकरेंनी सामनामधून इशारा दिलाय रिडल्स राम आणि कृष्ण प्रश्नावर महाराष्ट्र पेटवू… या बाळासाहेबाची त्या बाळासाहेबांना हात जोडून विनंती आहे, या महाराष्ट्रात काही पेटवायची गरज असेल तर गरिबांची चूल पेटवण्याची गरज आहे.. चला दोघे मिळून मिळून गरिबांची चूल पेटवू…” आणि सगळा तणाव एका क्षणात निवळला आणि पोलीस, सरकार यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या ग्रथांवर असेलेला वाद मिटवण्यासाठी आंबेडकरी नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकत्रित बसून या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असे नाही, अशी तळटीप टाकत हा वाद निकाली काढला.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे गटाने आता वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. पण आजच्या युतीने ३५ वर्ष जुन्या संघर्षाच्या आणि शांततापूर्ण वादाची आठवण महाराष्ट्राला झाली.