फसवणूक प्रकरणी बॉलिवूडची ही अभिनेत्री अडचणीत
न्यायालयाकडून वॉरंट जारी, अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि निर्माती अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमिषा विरोधात फसवूणक केल्याप्रकरणी न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. अनेकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतरही हजर न झाल्यामुळे अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायिक भागीदार कुणाल यांच्याविरुद्ध झारझंडमधील रांची दिवाणी न्यायालयाने फसवणूक, धमकी आणि चेक बाऊन्स प्रकरणात वॉरंट जारी केलं आहे.
अरगोरा येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी २०१८ मध्ये अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला होता. तक्रारीतील आरोपानुसार, अमिषा पटेलने चित्रपट बनवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले होते, पण हा चित्रपट बनू शकला नाही आणि अमिषाने पैसेही परत केले नाहीत.या प्रकरणी रांचीच्या दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. अमिषाला समन्स बजावण्यात आले होते, पण तरीही ती कोर्टात हजर राहत नाही, तसेच ती तिचा वकीलही पाठवत नाही. अशा स्थितीत अमिषा पटेलविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे. चेक बाऊन्स, फसवणूक आणि धमकावणे या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायीक भागीदार असलेल्या कुणालने सिनेमा पूर्ण झाल्यानंतर व्याजासह पैसे परत करणार असल्याचं सांगितलं होतं. अमीषानं ‘देसी मॅजिक’ या चित्रपटाची निर्मिती करणार असं सांगत तिनं अजयकडून हे पैसे घेतले होते. पण अद्याप हा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. अमिषाकडे पैसे परत मागितले तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. अनेक महिन्यांच्या विलंबानंतर अखेर तिने ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला २.५ कोटी आणि ५० लाखांचे दोन धनादेश दिले, परंतु ते दोन्ही बाऊन्स झाले असेही सिंग याने म्हटले आहे.
अमिषा पटेल ही बॉलिवूडची लोकप्रिय सिने-अभिनेत्री आणि निर्माती आहे.अमिषा लवकरच सनी देओलसह ‘गदर २’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट त्यांच्या २००१ च्या ब्लॉकबस्टर ‘गदर’चा सिक्वेल आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित, ‘गदर’ हा १९४७ मधील भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या आसपासच्या कालखंडावर आधारित आहे.