ही प्रसिद्ध अभिनेत्री डिसेंबरमध्ये घेणार सात फेरे
राजस्थानमधील चारशे वर्ष जुन्या राजवाड्यात होणार शाही विवाह
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या सौंदर्य आणि साऊथ चित्रपटांमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हंसिका मोटवानीने लग्नाचा महिना देखील फिक्स केला आहे. बी टाऊन आणि तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, तिचा विवाह जयपूर येथे पार पडणार आहे. जयपूर येथील ४५० वर्ष जुन्या मुंडाना किल्ल्यात शाही पद्धतीने हा विवाह पार पडणार आहे. हंसिकाच्या लग्नाची तारीख समोर आली नसली तरी शाही सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार, पॅलेसमधील सगळ्या रूम छान पद्धतीने सजवण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये असलेल्या लग्नासाठी आतापासूनच जोरदार तयारी करण्यात येत आहे. लग्नासाठी पुरातन काळातील रॉयल थीम ठरवण्यात आली आहे. हंसिका मोटवानीकडून तिच्या लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही किंवा तिने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मुंडोटा किल्ल्यात लग्नाची तयारी सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लग्नाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तिच्या स्वप्नातील राजकुमार कोण याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
हंसिकाने ‘शकलाका बूम बूम’ या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यासोबतच तिने हृतिक रोशनसोबत ‘कोई मिल गया’ या चित्रपटातही अभिनय केला आहे. यावर्षी हंसिकाचा ५० वा चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच ती तामिळ चित्रपट ‘रावडी बेबी’ मध्ये झळकणार आहे. हंसिकाने अगदी कमी वयात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव कमावले आहे. आता तिच्या चाहत्यांना लग्नाची प्रतीक्षा असणार आहे.