
या कारणामुळे झाला त्या चार इंजिनियरचा होरपळून मृत्यू
हिंजवडीत ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू, भीषण आगीत फक्त सांगाडेच उरले, व्हिडिओ व्हायरल
पुणे – आयटीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. यामध्ये, चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. आता या घटनेचे कारण समोर आले आहे.
ही घटना सकाळच्या सुमारास आयटी पार्कच्या फेज १ मधील हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन कार्यालयाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथीतरित्या ड्रायव्हरच्या सीटजवळ आग लागली, ज्यामुळे चालकाला गाडीतून उडी मारावी लागली आणि त्यानंतर मिनी-बस दुभाजकावर आदळली आणि अपघात घडला. दरम्यान, जखमींवर पुणे येथील रुबी हॉल क्लिनीक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बसमधून प्रवास करणारे कर्मचारी व्योमा ग्राफिक्स कंपनीचे होते. या आगीत सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे, राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी आठच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स हिंजवडी फेज एकमधून कंपनीकडे जात असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच गाडी दुभाजकाच्या बाजूला उभी करून, चालक आणि समोरील कर्मचारी तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता आला नसल्याने मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काहींच्या माहितीनुसार ते मागच्या दारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र काही सेकंदात बस धडाधड पेटू लागली. त्यामुळे या चौघांना बाहेर निघता आलं नाही. . ही आग इतकी तीव्र होती की मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. या घटनेत प्रदीप राऊत, प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोरी, जनार्दन हंबारिडकर – टेम्पो चालक हे जखमी झाले आहेत.
हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी. तसेच, गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे.