
बीडमध्ये ‘तुला खल्लासच करतो’ म्हणत तरूणाला मारहाण
व्हिडिओ व्हायरल, पोलीसांकडुन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?, बीडमध्ये गुंडाराज सुरूच
बीड – बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा क्रूर मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई येथे एका दलित तरुणाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ हा अंबाजोगाई येथील दस्तगीरवाडी इथला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. कृष्णा साळे नावाच्या तरुणाला ३ तरुणांनी जबर मारहाण केली आहे. ‘इथं काय दादागिरी करायला का, खपवून घेणार नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. फोन करं’ असं म्हणत लाथा बुक्याने या तरुणाला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पँथर सेनेचे दीपक केदार यांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. “हा अंबाजोगाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळे या तरुणाला ४ ते ५ मुलांनी बेदम मारहाण केली. ‘तुला खल्लासच करतो’ असं म्हणत या टोळक्याने बेदम मारहाण केली. जबर मारहाण केली आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे. मारहाण झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी चालढकल करून गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तातडीने गुन्हे दाखल केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमुळे चर्चेत आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, संतोष भोसले, तुकाराम मुंडे हत्या प्रकरण यांची चर्चा होत आहे.