Latest Marathi News
Ganesh J GIF

यंदाही शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला ठाकरे गटाचाच आवाज

शिंदे गटाची एैनवेळी माघार, शिंदे गटाचा मेळावा या मैदानावर होणार, हे आहे कारण?, आता यावर दावे प्रतिदावे

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- गेल्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही शिंदे ठाकरे गटात शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरुन वाद रंगला होता. पण दसरा मेळाव्यासाठीच्या मैदानावरून चालेल्या वादातून अखेर शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे यंदा शिवतीर्थावर ठाकरे गटाचा आवाज असणार आहे. पण आता यावरुनही राजकारण सुरु झाले आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची मागणी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही मुंबई महानगरपालिकेला अर्ज दिले होते. मात्र, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने हा अर्ज मागे घेतला आहे. यावेळी हिंदुत्वाचा विचार मांडण्यासाठी आम्हाला शिवाजी पार्क मैदान हवे होते. मात्र, आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हा विचार मांडता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली, त्यामुळे आम्ही अर्ज मागे घेतला, असे आमदार सरवणकर यांनी सांगितले आहे. आता क्रॉस मैदान, आझाद मैदानासाठी शिंदे गट आग्रही असणार आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं समीकरण झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जहाल हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही परंपरा सुरु ठेवली होती. पण शिवसेनेतील पडलेल्या फुटीनंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा यावर वाद होत आहे. पण आता शिंदे गटाच्या माघारीने ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. पण आता शिवसैनिक कोणाच्या मेळाव्याला पसंती देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण तुम्ही दसरा मेळावा घ्या, लोकं जमा करा, पंरतु तुमच्या सभेपेक्षा आमच्या सभेला चौपट लोक राहतील, असे मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटले आहे. तर आरशासमोर राहुन स्वत: चा चेहरा पाहावं. आपल्या मनाला विचारावं की आपण खरोखरच शिवसेना आहोत का ? दिल्लीच्या भाजपच्या नादाला लागून लफंगेगिरी करत आहोत का ? महाराष्ट्राच्या १८ कोटी जनतेला माहिती आहे, शिवसेना कुणाची आहे ? असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

गेल्यावर्षी दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला होता. दोन्ही बाजूच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली होती. यंदाही अशाप्रकारची कायदेशीर लढाई झाल्यास ठाकरे गटाला पुन्हा सहानुभूती मिळू शकते असा अंदाज असल्याने शिंदे गटाने या वादातून माघार घेतली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!