मिस युनिव्हर्स स्पर्धेत ही तरुणी करणार भारताचे प्रतिनिधित्व
मिस युनिव्हर्स स्पर्धेचा ग्रँड फिनाले या शहरात रंगणार, चौथ्यांदा मिळणार का भारतीय सुंदरीला बहुमान?
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- फॅशन जगतात मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स २०२३ चा ग्रँड फिनाले एल साल्वाडोर येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व श्वेता शारदा करणार आहे. तब्बल ९० देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
श्वेता शारदा एक मॉडल, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तिने यावर्षी ‘मिस दिवा युनिव्हर्स’ हा किताब जिंकला होता. श्वेता शारदाने आपल्या इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. मिस दिवा युनिव्हर्स २०२२ चे मुकूट परिधान केल्यानंतर आता ती ७२ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. वयाच्या सोळाव्या वर्षी ती तिच्या आईसोबत मुंबईला स्थलांतरित झालीय. श्वेताने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तिचे अंडरग्रेजुएट शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलंय आणि डान्स दिवाने, डान्स प्लस आणि डान्स इंडिया डान्स यांसारख्या लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी यजमान देश म्हणून एल साल्वाडोरची निवड करण्यात आली आहे. तर प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर्स जीनी माई जेनकिन्स आणि मारिया मेनुनोस माजी मिस युनिव्हर्स ऑलिव्हिया कल्पोसोबत या प्रतिष्ठित स्पर्धेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. मध्यंतरी दिवाचा किताब जिंकल्यानंतर ती म्हणाली होती की, सध्या तिचे संपूर्ण लक्ष मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्यावर आहे. ती या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी तयारी करत आहे. ती बॉलिवूड लव्हर आहे. तिला भविष्यात अभिनेत्री व्हायचं आहे. आता श्वेता शारदाला मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी अनेकजण शुभेच्छा देत आहेत. आता ती हा किताब जिंकणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान मिस युनिव्हर्स ही दुसरी सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे, जी जून १९५२ मध्ये सुरु झाली होती. फिनलंडची आर्मी कुसेला ही पहिली मिस युनिव्हर्स ठरली होती.
सुष्मिता सेन हिने १९९४ साली भारताकडून पहिल्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली होती. तर सन २००० साली मारा दत्ता हिने ही स्पर्धा जिंकली होती. तर हरनाझ कौर संधूने मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धा जिंकून भारताला अभिमान वाढवला होता. आता श्वेता शारदा जिंकल्यास चाैथी भारतीय ठरणार आहे.