शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालत काढावी लागते पुराच्या पाण्यातून वाट
नागझरी नदीवर पुल बांधण्याचे आश्वासन हवेतच, दहिटणे ग्रामस्थांनी दिला निर्वाणीचा इशारा
बार्शी दि १५(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. हातचे आलेले पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पण बार्शी तालुक्यातील नागझरी नदीला पूर आल्याने दहिटणे गावातील नागरिकांना नदी पार जीव धोक्यात घालावा लागत आहे. वारंवार पुलाची मागणी करूनही प्रशासन लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थानी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बार्शी तालुक्यातील दहिटणे गावातील नागझरी नदीला यंदाच्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नदीवर पूल व्हावा यासाठी गावकऱ्यांनी अनेकवेळा स्थानिक आमदारांना आणि संबंधित प्रशासनाला निवेदन दिले आहे. पण गावकऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. दहिटणे गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे शेत नदीपलीकडे म्हणजे सासुरे रस्त्याला आहे. त्यासाठी त्यांना नागझरी नदी ओलांडून ये जा करावी लागते.यंदाच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन सारखे नगदी पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी संकटात आहे.त्यातही शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालत नदीच्या पूरातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शाळकरी मुलांनाही पुरामुळे शाळेला जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन याठिकाणी पूल बांधणार का? असा सवाल विचारत लवकरात लवकर नागझरी नदीवर पुल न उभारल्यास साखळी उपोषणाचा इशारा दहिटण्यातील शेतकरी आणि गावकऱ्यांनी दिला आहे.

नागझरी नदी तुळजापूर परिसरात उगम पावत पुढे सीना नदीला जाऊन मिळते पण नदी हंगामी आहे असे सांगत या नदीवर पुल उभारण्यास प्रशासनाने कायम टाळाटाळ केली आहे. दहिटणे भागात कोल्हापूरी बांधल्यानंतर पाण्याचा फुगवठा वाढतो त्यामुळे कमरेएवढ्या पाण्यातून लोकांना येजा करावी लागते. त्यामुळे दहिटणे ग्रामस्थानी दिलेल्या उपोषणाच्या इशा-यानंतर तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन लक्ष देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.