
इन्स्टाग्राम स्टेटसवरुन पुण्यात दोन गटात जोरदार राडा
हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, 'हे' स्टेटस ठरले गटातील हाणामारीचे निमित्त
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात उरुळी कांचनमध्ये इंस्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. याची जोरदार चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उरुळी कांचनमधील एक अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र हे उरुळी कांचन पद्मश्री मनिभाई देसाई ज्युनिअर कॉलेज येथे थांबले होते. त्यावेळी तिथे दुसऱ्या गटातील काही विद्यार्थी आले आणि त्यांनी त्याला इंस्टाग्राम अकाऊंटवर पुष्पा सिनेमा स्टाईल सारख्या ठेवलेल्या स्टेटस बाबत त्याला जाब विचारला. त्या मुलांनी कारण सांगण्यास नकार दिला असता आरोपींनी त्याला आणि मित्रांना शिवीगाळ केली.यानंतर दोन्ही गटात वाद झाला आणि या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झाले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना लोखंडी स्टिक, लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एक वर्षापूर्वी झालेल्या प्रेम प्रकरणावरून या अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.या २ गटात झालेल्या हाणामारीत ४ जण जखमी झाले आहे. दरम्यान परिसरात याची चर्चा होत आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात काल परस्परविरोधी गुन्हे दाखल असून पोलीसांनी प्रेम दत्तात्रय कांचन, रुषिकेश चांदगुडे, प्रथमेश दत्तात्रय कांचन, जयेश सुदाम कांचन, चैतन्य अप्पासो महाडीक व तीन अल्पवयीन मुले असे एकूण ११ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.