‘उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं’
ठाकरे गटाच्या खासदाराची ठाकरेंवर टिका, शिंदेच्या बंडाचे कारणही सांगितले
हिंगोली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवगर्जना अभियान सुरू केले आहे. या शिवगर्जना सभेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टिका करत घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शिवगर्जना मेळाव्यात बोलताना खासदार बंडू जाधव म्हणाले की, “ठाकरेंनी पोराला मंत्री करायला नको होतं. आणि पोराला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं, दोघेही मंत्री झाल्यामुळे पक्ष संघटनेकडे लक्ष देता आले नाही मंत्रीपदाच्या दोन खुर्च्या अडल्या गेल्यामुळे बाप गेला तरी पोरगा माझ्या डोक्यावर बसणारच असे एकनाथ शिंदे यांना वाटले यामुळेच त्यांनी बंड केले. आणि गद्दारांना संधी मिळाली” असे स्पष्ट मत जाधव यांनी मांडले हिंगोलीच्या औंढा शहरात या अभियानाअंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या नेत्याला घरचा आहेत दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेले नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतरही त्यांनी गद्दारी केली. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कोणत्याच मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसऱ्या कुणाला दिले नव्हते, ते शिंदेना मिळाले होते तरी गद्दारी का केली असे म्हणत जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार टिका केली आहे.