
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पहिली लढाई जिंकली
ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर न्यायालयाचा 'हा' आदेश, भाजपाला धक्का
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईमहापालिकेला दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली आहे.
मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांच्याविरोधात लाच घेणे आणि भ्रष्टाचाराची एक तक्रार १२ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने मंजूर केला नसल्याचा दावा पालिकेने केला होता. त्याचबरोबर महापालिका आयुक्तांनी नोटीस कालावधी शिथिल करण्याचा आपला विशेषाधिकार विशिष्ट पद्धतीने वापरावा, असे हायकोर्ट सांगू शकत नाही असाही दावा महापालिकेने केला होता. पण न्यायालयाने उद्या ११ पर्यंत राजीनामा स्विकारल्याचे पत्र देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे लटकेंना दिलासा मिळाला आहे. तर यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेचा दावा करणाऱ्या शिंदेना भाजपाचा प्रचार करावा लागणार आहे.तर लटकेंबद्दल सहानभुती असल्याने भाजपाला विजयासाठी झगडावे लागणार आहे. त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत.
ऋतुजा लटके यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा प्रशासनाने स्वीकारला नाही. त्यामुळे शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राजकीय दबावापाोटीच त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असा दावा ठाकरे गटाने केला होता. पण अखेर न्यायालयाने लटके यांना दिलासा दिला आहे. हा निर्णय शिंदे गटासाठी धक्का मानला जात आहे.