Latest Marathi News
Ganesh J GIF

वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

दिल्ली, दि. ९ (प्रतिनिधी) – मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून सोलापूर येथे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस उद्या पासून सुरु होत आहे. ही गाडी दौंड मार्गेच सोलापूरकडे रवाना होणार आहे. तथापि तिला दौंड रेल्वेस्थानक थांबा देण्यात आलेला नाही. उद्या गाडीचा पहिलाच दिवस असल्याने उद्या मात्र ही गाडी दौंडला थांबणार आहे. त्यानंतर मात्र दौंड स्थानक कायमस्वरुपी वगळण्यात आले आहे. ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने ट्विट करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या बाबतीत दौंडचे महत्व लक्षात आणून दिले आहे.

दौंड हे रेल्वेच्या सोलापूर मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. इतकेच नाही, तर दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे सर्वात मोठे रेल्वेस्थानक दौंड येथे आहे. हजारो प्रवासी या मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे या परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी या ट्रेनला या स्थानकावर थांबा देण्याची आत्यंतिक गरज आहे. तरी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ला दौंड येथे थांबा देण्याबाबत आवश्यक ते सोपस्कार पार पाडावेत, असे सांगत ते आपल्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करतील, असे सुळे यांनी म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!