दसरा मेळाव्यात आवाज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच
'या' कारणामुळे एकनाथ शिंदेना घ्यावी लागणार अन्यथा माघार, अडचणी वाढणार
मुंबई दि ५ (प्रतिनिधी) – शिवसेना फुटल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना, शिंदेगट की मनसे कोणाला परवानगी मिळणार हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पण मुंबई महापालिकेच्या एका निर्णयामुळे शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना एकनाथ शिंदे यांना माघार घ्यावी लागणार आहे.
शिवसेनेनं मुंबई पालिकेकडे सर्वात आधी म्हणजे २२ आॅगस्टला अर्ज केला आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. आणि महापालिकेचे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या धोरणानुसार, शिवसेनेला परवानगी मिळणार आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे. कारण न्यायालयातही शिवसेना आमचीच हे सिद्ध करताना दसरा मेळाव्याचा पुरावा सादर केला जाऊ शकतो. यंदाच्या दसरा मेळाव्यावर शिंदे गटानेही दावा केल्यामुळे वादंग निर्माण झाले आहे. पण, शिवतीर्थावर मेळावा किंवा सभा घेण्याची परवानगी देण्याबाबत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य परवानगी देण्याचं पालिकेचं धोरण आहे. त्यानुसार, शिवसेनेनं आधी मुंबई पालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. सेनेच्या अर्जानंतर शिंदे गटानेही अर्ज केला आहे. त्यामुळे पालिका शिवसेनेला परवानगी देण्याची शक्यता आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो.
शिवतीर्थ हा मुंबई उच्च न्यायालयााने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार, वर्षातून ४५ दिवसच शिवतीर्थावर सभा घेण्याची परवानगी आहे. त्यापैकी ३६ सभांना परवानगी देण्याचे अधिकार मुंबई पालिकेचे आहेत. दसरा मेळाव्याचाही त्यात समावेश आहे. आणि पालिकेचे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ठाकरेंना फायद्याचे ठरणार आहे पण सरकार हातात असूनही शिंदेना माघार घ्यावी लागणार आहे.