वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान
चांद्रयान-३ वरील चर्चेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभेत दोन्ही कंपन्यांचा गौरव
दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- ‘चांद्रयान-३’ मोहिमेत बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत काढले. लोकसभेत ‘चांद्रयान-३’ मोहिम आणि भारताच्या अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयोजित चर्चेत सहभागी होताना. त्यांनी आपला मतदार संघ आणि या दोन कंपन्यांचा आवर्जून उल्लेख केला.
प्रधानमंत्री आपल्या भाषणात नेहमी स्वदेशी बनावटीच्या उपकरणांचा उल्लेख करतात. तो धागा पकडून खासदार सुळे यांनी, चांद्रयान मोहिमेतील इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि इतर उपकरणे आपल्या मतदारसंघात तयार झाली ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. वालचंदनगर इंडस्ट्री ही शंभरहून अधिक वर्षांची तर व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्सची तेरा चौदा वर्षांची वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले. भानुदास भोसले, सुजाता भोसले, संदिप चव्हाण आणि सोमसुंदर यांनी या कंपनीच्या माध्यमातून चांद्रयान मोहीमेसाठी काम केले. अशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असे त्यांनी नमूद केले. चांद्रयान मोहीमेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या साठ वर्षांतील आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक परीक्षांचे ‘चांद्रयान-३’ हे फलित आहे. आपल्या शास्त्रज्ञांचे प्राविण्य, क्षमता आणि गुणवत्ता यांच्या जोरावर ‘इस्रो’ने हे शक्य करुन दाखविले. इस्रोच्या यशात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, थोर शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्यासह इ. व्ही. चिटणिस, प्राफेसर धवन, डॉ ब्रह्मप्रकाश, यू. आर. राव, डॉ. नायर, डॉ. के. कस्तुरीरंगन, डॉ कृष्णा, डॉ शिवम्, डॉ सोमनाथ अशा थोर शास्त्रज्ञांचे अतुलनिय योगदान आहे, असे त्या म्हणाल्या.
चांद्रयान मोहिमेबाबत सरकारच्या वतीने करण्यात आलेले भाषण जोरदार होते. परंतु या भाषणाने किंचित निराशा हाती आली, असे सांगताना सुळे यांनी अंधश्रद्धेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या भाषणातून ‘चांद्रयान-४’ किंवा ‘आदित्य एल वन टू थ्री’ मोहिमेबाबत काही वाट दिसेल. भविष्याची दिशा दिसेल अशी अपेक्षा होती. गणित, मापनशास्त्र, अवकाशशास्त्र आदी क्षेत्रात भारतीयांनी प्राचीन काळापासून अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. ही कामगिरी लक्षात घेता आपण ते ज्ञान पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. पण काही लोक अंधश्रद्धेत अडकले आहेत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. महाराष्ट्रात एका भाजपा आमदाराकडे एक बाबा आला होता. ती व्यक्ती अंगावर कांबळं टाकून लोकांना बरे करीत असल्याचा दावा करीत होता. चांद्रयानाची चर्चा करताना दुसरीकडे आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो हे बरोबर नाही. डॉ नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी आदींनी अंधश्रद्धेच्या विरोधातील लढ्यात आणि विज्ञाननिष्ठ विचारांसाठी बलिदान दिले, हे आपण विसरता कामा नये’. माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या, ‘झोपेत पडलेली स्वप्ने ही स्वप्ने नव्हेत, तर जी पूर्ण होईपर्यंत तुम्ही झोपत नाही ती खरी स्वप्ने’ या वचनाचा सुळे यांनी उल्लेख केला.