‘राष्ट्रवादी काँग्रेसने २००४ साली मुख्यमंत्रीपद सोडणे मोठी चूक’
अजित पवारांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टिका, राष्ट्रवादीतील मतभेद समोर
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी पक्षाची स्थापना होऊन २५ वर्ष होऊनही त्यांचा अजून मुख्यमंत्री होऊ शकला नाही याची सल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मनात अजून आहे. पण एका मुलाखतीत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाना साधला आहे.
अजित पवारांना राजकीय जीवनात केलेल्या चुकांविषयी विचारणा केली असता अजित पवारांनी २००४ साली मुख्यमंत्रीपद सोडणे चूक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा ७२ जागा मिळाल्या होत्या, त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद सोडून द्यायला नको होते. तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडणे ही चूक होती. कुणालाही मुख्यमंत्री करायचं होतं. आर. आर. पाटील, छगन बुजबळ किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात जे होते त्या कुणालाही करायला हवे होते. पण आमचे सर्वोच्च नेते, प्रफुल्लभाई, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह पाटील हे आमचे नेते होते. त्यांनी सांगायचं आणि आम्ही जी म्हणायचं असं होते” असे म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाना साधला आहे.
पहाटेच्या शपथविधीवर बोलताना त्यांनी सकाळी आठ वाजता झालेला शपथविधी पहाटेचा कसा असू शकतो असे म्हणत प्रतिप्रश्न केला आहे. तर २०२४ साली मुख्यमंत्रीपद आल्यास काय कराल? असे विचारले असता “हे आत्याबाईला मिशा असत्या तर छान झालं असतं तसं सांगण्यासारखं आहे असे म्हणत त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असल्याचे सांगितले आहे.