शिंदे गट म्हणतो भाजपा आम्हाला विश्वासातच घेत नाही
शिंदे गटाचा भाजपावर मोठा आरोप, विधान परिषद निवडणुकीत डावलल्याचा आरोप
अमरावती दि ३(प्रतिनिधी) – भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात अजूनही बेबवान दिसून येत आहे. आताच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
अमरावती मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार संजय गायकवाड यांनी भाजपावरच टिका केली आहे ते म्हणाले “अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही. तसे झाले असते तर पदवीधरचा निकाल वेगळाच लागला असता, जिल्ह्यात आमचा खासदार आहे, दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला सोबत घेतले असते तर पंधरा-वीस हजारांचे मतदान दिले असते, असा दावाच संजय गायकवाड यांनी केला. पण याच बरोबर हा विजय आघाडीचा नसून बारा वर्षांपासून रणजीत पाटील आमदार असल्याने त्यांच्या विरुद्ध ‘अँटी इंकंबन्सी’ हा घटक पराभवात महत्त्वाचा घटक ठरला. त्याचप्रमाणे जुनी पेन्शन हा कळीचा मुद्धा ठरल्याचेही गायकवाड म्हणाले आहेत.
अमरावतीमध्ये विधान परिषदेचा लांबलेला निकाल अखेर महाविकास आघाडीच्याच बाजून लागला. या ठिकाणी धीरज लिंगाडे विजयी झाले त्यांनी भाजपाच्या रणजित पाटील यांचा पराभव केला. धीरज लिंगाडे यांना एकूण ४६३४४ मतं पडली, तर भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांना ४२९६२ मत मिळाली. धीरज लिंगाडे यांचा ३३८२ मतांनी विजय झाला. त्यामुळे गायकवाड यांच्या दाव्यामुळे दोन पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.