Latest Marathi News
Ganesh J GIF

राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

या तारखेला होणार विस्तार, अजित पवार गटाकडून हे आमदार होणार मंत्री, भाजप शिंदे गटातील आमदार अस्वस्थ?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे सरकारचा बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार अजूनही पार पडलेला नाही. अजित पवार सत्तेत सामील झाले आणि आपल्यावर आलेल्यांना मंत्रीपद देखील मिळवून दिले. पण सरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आले असूनही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही रखडलेलाच आहे. पण आता हा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्रिपद घेतल्यानंतर त्यांच्याकडीलच महत्त्वाचे अर्थमंत्रिपदही मिळविले. चार दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना पालकमंत्रिपदेही मिळवून दिली आहेत. विशेष म्हणजे शिंदे गट आणि भाजपाचा विरोध झुगारत त्यांनी महत्वाची पदे मिळवली आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाकडून मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. पण या मंत्रीमंडळातही अजित पवार गटातील तीन आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या केवळ पितृपक्षामुळे मुहूर्त लांबला असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी घटस्थापनेचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाकडून वाईचे आमदार मकरंद पाटील, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नगरचे आमदार संग्राम जगताप यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत. यातील मकरंद पाटील यांना कॅबिनेट, तर सतीश चव्हाण व संग्राम जगताप यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील भरत गोगावले, संजय शिरसाट यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपाकडूनही अनेकजण इच्छुक आहेत. आता कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण आगामी निवडणुका लक्षात घेऊनच विस्तार होणार आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे गेल्या सोळा महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्तार आणि त्याची चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यानच्या काळात मंत्रीमंडळ विस्ताराचे कितीतरी मुहूर्त सांगतिले. पण त्यातील एकही खरा ठरला नाही. त्यामुळे आता तरी विस्तार होणार का? हे पहावे लागेल

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!