
‘वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं’
भाजपातील प्रवेशावर अमोल कोल्हे यांचे विधान, योग्य वेळी भाजपात प्रवेश?
पुणे दि २५(प्रतिनिधी)- शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजपा प्रवेशाच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शिवप्रताप चित्रपटाचेळी अमित शहांची घेतलेली भेट आणि राष्ट्रवादीच्या महत्वाच्या कार्यक्रमांना मारलेली दांडी या कारणांवरुन त्यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण कोल्हे यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. पण आता कोल्हे यांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे यावर भाष्य केले आहे.
शिरूर मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही, वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असतं, निवडणूक अजून खूप लांब आहे, आताच पक्षांतर आणि नाराजी या गोष्टींच्या चर्चा करण्यात काहीही तथ्य नाही. अकारण बुद्धीभेद करण्याचा हा प्रयत्न विकासाच्या वाटेपासून दूर नेणारा आहे, माझं वैयक्तिक मत असंच आहे, की निवडणूक हे केवळ माध्यम आहे, तर सत्ता हे निव्वळ साधन आहे. साध्य आहे ते मतदारांचा विश्वास सार्थ ठरवणं, शाश्वत विकासाची वाट धरणं आणि लोकांचं कल्याण करणं असे म्हणत त्यांनी आपल्या पक्ष बदलावर मत व्यक्त केले आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हे पक्ष बदलणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपाचे मंत्री प्रल्हाद पटेल यांनी शिरुरमध्ये भाजपाचा खासदार असेल असा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गडात गेलेले आढळराव यांनी वळसे पाटलांकडे आपल्या फे-या वाढवल्या आहेत. कोल्हे भाजपात गेल्यास हाती घड्याळ घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर राष्ट्रवादीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी शिरूर मधून पार्थ पवार यांना तिकीट देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.त्यामुळे आगामी काळात चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.