‘…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन’
खासदार उदयनराजे भोसलेंचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना आव्हान, साता-यात आरोपांची राळ
सातारा दि २५(प्रतिनिधी)- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण त्यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे.
खासदार उदयनराजे म्हणाले की, “माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा की, आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे आणि काय केलं आहे, आम्ही मान्य करु, हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. तसं कोणी जर बोललं तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन, परत तोंड दाखवणार नाही. असे म्हणत आव्हान दिले आहे. त्याचबरोबर पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत. तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली.’ अशी टिका त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केली आहे.असे खडे बोल सुनावले आहेत. ज्यांच्या जीवावर यांनी संस्था स्थापन केल्या ते सर्वांना माहिती आहे. मला लाज वाटतेय सांगताना, बोलतानासुद्धा कमीपणा वाटतो. मला बोलू की नको असं झालंय, पण अजिंक्यतारा कुक्कटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर अनेक संस्थांद्वारे यांनी लोकांचे पैसे खाल्ले, असा पलटवारही उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंवर केला आहे.
‘मी भुवया काढीन, मी मिशा काढीन, समोरासमोर या’, हे उदयनराजेंचे नेहमीचेच डॉयलॉग आहेत. सातारकरांना त्याची सवय झाली आहे. प्रत्यक्षात ते त्यांचा शब्द कधीच पाळत नाहीत. जर आपण इतके महाविकासपुरुष होता, तर लोकसभेच्या निवडणुकीत का पडलात, अशा शब्दात टीका करत शिवेंद्रसिंहराजें यांनी उदयनराजे यांची खिल्ली उडवली आहे.