
हे कुठलं न्यायदान? सेवा देणारे बस कर्मचारी रात्रभर कार्यालयाबाहेर; पाटस ग्रामपंचायतीच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल.
पुणे महानगर पालिकेच्या पीएमपीएमएलच्या बस पाटस ते हडपसर मुक्कामी बसच्या चालक आणि वाहकांना रात्रभर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर झोपावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ग्रामपंचायतीने विश्रांतीसाठी कार्यालयाचे कुलूप काढण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांना उघड्यावर रात्र काढावी लागली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या जाणीवपूर्वक उदासीन वागणुकीमुळे पीएमपीएमएलच्या बस वाहक व चालक संघटना आणि पाटस परिसरातील प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,मागील अनेक वर्षापासून पाटस परिसरातील सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना यांनी पाटस ते हडपसर पीएमपीएमएलची बस सेवा सुरु करण्याची मागणी करीत होते. सातत्याने पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी हडपसर ते पाटस – पुणे सोलापूर मार्गावर धावू लागल्या.या बससेवा सुरु झाल्याने शुभारंभ आणि उद्घाटन करण्यासाठी स्थानिक गाव पुढाऱ्यांनी गर्दी केली होती. काहींनी आमच्यामुळेच ही बस सुरू झाल्याचा दावा करत श्रेय लाटण्यासाठी वादंग घातले, यावेळी या बसच्या चालक आणि वाहक यांची ग्रामपंचायत कार्यालयातील वरच्या इमारतीत रात्रीच्या वेळी झोपण्याची आणि विश्रांतीसाठी व्यवस्था केली जाईल त्यांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन स्थानिक गाव पुढाऱ्यांनी आणि तत्कालीन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी दिले होते.

मात्र त्यांचे हे आश्वासन केवळ हवेतच विरले असल्याचे चित्र आहे. पीएमपीएमएलच्या बसेस पाटस येथे मुक्कामी असतात. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत या बसेस पाटस ते हडपसर पर्यंत तासातासांच्या अंतरावर धावतात. ही बससेवा सुरळीत झाल्याने पाटस, कानगाव, रेल्वे स्टेशन,रोटी,हिंगणीगाडा, कुसेगाव, वासुंदे, दौंड शहरातील पुणे शहरात नियमित कामानिमित्त जाणाऱ्या कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.पीएमपीएमएलची ची शेवटची बस रात्री उशिरा पाटस येथे पोहोचते आणि मुक्कामी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात उभी असतात. चालक- वाहकांना भल्या पहाटे सकाळच्या पहिल्या फेरीसाठी पाटस येथेच मुक्काम करावा लागतो. यासाठी ग्रामपंचायतीने इमारतीतील एक खोली विश्रांतीसाठी दिली आहे. मात्र मागील चार पाच दिवसांपासून बसेसच्या चालक आणि वाहक यांना मोठ्या गैरसोयीचा आणि ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या हिन वागणुकीचा सामना करावा लागत आहे.सोमवारी रात्री 10:30 वाजता बस पाटस ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोहोचली. मात्र कार्यालयाला कुलूप होते. चालकाने ग्रामसेवक व सरपंचांना फोन केला असता ‘आता रात्री कोणी येणार नाही, कुलूप काढता येणार नाही’ कुलूप बदलले आहे, आम्हाला चावी देऊ नका असे सांगितले आहे. असे उत्तर मिळाले. शेवटी नाईलाजाने दोन्ही कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील गावचे भुषण भिमा पाटस कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै,मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी झोपावे लागले.‘आम्ही दिवसभर 12-14 तास ड्युटी करतो. रात्री नीट झोप नाही मिळाली तर सकाळी गाडी कशी चालवणार? प्रवाशांच्या जिवाचा प्रश्न आहे. डास, उन्हाच्या दिवसभर तीव्रतेमुळे रात्रीचा उकडा आणि कुत्र्यांच्या भीतीने रात्रभर झोप लागली नाही’, तर आमच्या कडे रोख रक्कम असते चोरट्यांची ही भीती आहे. अशी व्यथा चालकाने व्यक्त केली. आम्ही सकाळी विश्रांती खोलीची साफसफाई आणि स्वच्छता करुन ठेवतो, मात्र ग्रामपंचायतीने आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता चावी न देणे टाळणे हा चुकीचा प्रकार असुन आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत तक्रार करणार आहे.

दरम्यान, याबाबत ग्रामविकास अधिकारी दीपक बोरावके यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले याबाबत कल्पना नसुन माहिती घेतो असे उत्तर दिले.तर या प्रकारानंतर पाटस अनेक प्रवाशांनी ग्रामपंचायत चा कारभार पाहणाऱ्या गावभारी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘चालक-वाहकांना नीट विश्रांती न मिळाल्यास अपघाताचा धोका वाढतो.ग्रामपंचायतीने किमान रात्रीच्या वेळी तरी चावीची व्यवस्था करुन देणे गरजेचे आहे. यासंदर्भात पीएमपीएमएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे’, अशी मागणी केली आहे. दरम्यान, रात्री- अपरात्री गावात येणाऱ्या या एसटी बसेस कर्मचाऱ्यांसाठी किमान निवारा व स्वच्छतागृहाची सोय असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


