
कुत्र्याची शिकार करताना बिबट्या शिरला थेट घरात
थरारक प्रसंग कॅमे-यात कैद, वनविभागाकडून बिबट्या जेरबंद
सातारा दि ७(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यात काल भलताच बाका प्रसंग कोयना परिसरातील हेळवाक गावात पहायला मिळाला. कोयनेच्या जंगलातील बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात या भागातील हेळवाक गावात घुसला. शिकारीसाठीचा हा थरार ग्रामस्थांनी डोळ्यांसमोर पाहिला. तर काहींनी हा प्रसंग कॅमे-यात कैद केला आहे. कोयनेच्या जंगलात अनेकदा बिबटे आढळून आले आहेत. पण गावात बिबट्या शिरण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
एका कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या त्याच्या मागे लागला होता. त्यामुळे कुत्रा जीव वाचवण्यासाठी एका घरात घुसला. कुत्र्याच्या शिकारीसाठी हा बिबट्याही कुत्र्यापाठोपाठ त्या घरात घुसला.पण घाबरून न जाता घरमालक सुधीर कारंडे यांनी घराला बाहेरून लगेच कडी लावत वनविभागाला कळवले. वनविभागाने तातडीने गावात दाखल होत पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर चार तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजर्यात कैद करण्यात यश आलं. ही घटना अतिशय थरारक घटना कॅमे-यात कैद करण्यात आली आहे.
बिबट्या गावात घुसल्याने गावातील लोक भयभीत झाले होते.बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं.बिबट्यावर आता प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे.