‘कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले’
राणा दांपत्यासमोर आंबेडकरी अनुयायांची घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल
अमरावती दि १६(प्रतिनिधी)- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा कायमच चर्चेत असतात. हनुमान चालीसा प्रकरणापासून तर ते कमालीचे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने विजयी होऊनही भाजपाला पुरक भूमिका ते घेत असतात. नेमक्या याच मुद्द्यांवर त्यांना स्वतः अमरावतीत भीम सैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम आणि शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. अमरावतीतही इर्विन चौकाचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करण्यात आले त्या कार्यक्रमासाठी नवनीत राणा व रवी राणा उपस्थित होते. मात्र, यावेळी अनुयायांनी “कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले” अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अचानक झालेल्या या घोषणाबाजीने राणा दांपत्य पुरते गोंधळून गेले होते. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम स्थळावरून तत्काळ काढता पाय घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनाही शुक्रवारी चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमा वेळी संतप्त आंबेडकरी अनुयायांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमीहिन सबळीकरण योजना, मिनी ट्रॅक्टर बचत गट योजना, गटई स्टॉल वितरण आदी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी लाभ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या ‘समन्याय’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.