शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण, अजितदादा की सुप्रियाताई?
सर्वेक्षणाचा धक्कादायक निकाल,महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रतिक्रिया, बघा सर्व्हे
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण यावर पक्षात खल सुरु आहे. शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? हे विचारात घेता खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेता अजित पवार, आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. यावर सकाळ-साम समुहाने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. यशवंराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत या राजीनामा नाट्यावर चर्चा सुरु होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव अध्यक्षपदासाठी घेतले जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांचेही नाव चर्चेत आहे. शरद पवार यांनीही एकूण अंदाज घेऊन अखेर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ द्या, अशी कार्यकर्त्यांची समजूत घातली. आता येत्या ५ मे रोजी अध्यक्षपदाचा निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली. पण त्याआधी सकाळ सामाजिक या वृत्तवाहिनीने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये चकित करणारी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे यांना ३५.२% लोकांनी पसंती दिली आहे, तर अजित पवार यांना ३२. १% लोकांनी पसंती दिली आहे. तर जयंत पाटील यांना १६.६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर दुसरीकडे सी व्होटरने पवार यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काय केले पाहिजे. कोणाबरोबर गेले पाहिजे, असा सर्वे करण्यात आला आहे. त्यात ५७ टक्के लोकांचे म्हणणे की राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा घटक राहिले पाहिजे. तर २३ टक्के लोकांचे म्हणणे आहे की राष्ट्रवादीने भाजपबरोबर गेले पाहिजे. तर राष्ट्रवादीने कुणाबरोबर न जाता एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे वीस टक्के लोकांचे मत आहे. एकंदरीत अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे वरचढ ठरल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या आकांक्षेला अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
सध्या शरद पवार यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण यावर यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये दिवसभर मंथन आणि बैठका सुरू होत्या. सुप्रिया सुळे यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी आणि अजित पवारांकडे राज्याची जबाबदारी, असे धोरण ठरल्याचे सांगण्यात येत होते. पण त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.