दिल्ली दि ३(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षासह शिवसेना कोणाची यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का? हेही आज कळणार आहे.
राज्यात ३० जूनला शिंदे-फडणवीसांचे सरकार अस्तित्वात आले आहे. पण त्या आधीच महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका तसेच शिंदे गटातील आमदारांना ठाकरे गटाने अपात्र ठरविणे, त्याचवेळी आपलाच गट अधीकृत असल्याचे सांगत शिंदे गटाने सादर केलेली याचिका आणि शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावणाऱ्या विधासभा उपाध्यक्षांच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका, या सर्वांवर एकत्रित सुनावणी होणार आहे.त्याचबरोबर ८ आॅगस्टला निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचाही फैसला आज होणार आहे. मागेही कोर्टात सुनावणी झाल्यानंतर पुढची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे आज निकाल येणार की, पुढली तारीख दिली जाणार हे आज कळणार आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.कोर्टात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिवसेनेच्या बाजूने आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे शिंदे गटाच्या बाजूने युक्तीवाद करत आहेत.