मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लवकरच निरोप देण्यात येणार?
एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन, रंगल्या वेगळ्याच चर्चा
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे सरकारच्या भोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदाचा तिढा, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची धोक्यात आलेली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची याच गोष्टी जास्त चर्चेत आहेत. आता या सर्व गोष्टीवर पडदा टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडून गुरुवारी संध्याकाळी वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये स्नेहभोजन पार पडणार आहे. शिंदेंच्या या डिनर डिप्लोमसीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. कारण अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्डवाॅर सुरु झाल्यानंतरचे हे पहिलेच स्नेहभोजन असणार आहे. विशेष म्हणजे या स्नेहभोजनाला राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), आणि भाजप या तिन्ही पक्षांचे मंत्री सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. मु्ख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे हे निरोपाचे भोजन असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे या स्नेहभोजनाला कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आणि हे स्नेहभोजन निरोपाचे ठरणार की आपणच मुख्यमंत्री राहणार हे सुचित करण्यासाठी ठरणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा वारंवार समोर येत आहेत. त्यातच आजारपणाचे कारण समोर करून शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येणार अशीही चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनीच खुलासा करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.