एकनाथ शिंदे या दिवशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार?
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा पुन्हा जोरात, अजित पवारांच्या त्या कृतीने शिंदे गट अस्वस्थ, काय घडले?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक फेरबदल होत आहेत. कोण कोणासोबत जाईल आणि कोणाची खुर्ची कधी जाईल याची शाश्वती नाही. त्यातच अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे पद धोक्यात आले आहे. शिंदे यांचे पद जाणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. पण आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच उचलबांगडी होणार असल्याचा दावा केला आहे.
अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे शिंदे बरोबरच शिंदे गटाची अस्वस्था वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यात पुढील महिन्यात नेतृत्व बदल होणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, येणार्या १५ ते २० दिवसांत काय बदल होईल हे महाराष्ट्राची जनता बघेल. या बदलात मुख्य खुर्चीपासून सुरुवात होईल हे मी खात्रीने सांगतो. सप्टेंबर महिना हा सत्ता बदलाचा असेल. याचा अर्थ आमची सत्ता येईल, असे नाही, मात्र मुख्य खुर्ची बदलेल आणि सत्ता बदलाला सुरुवात होईल, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी भोजनाचे आवतन दिले त्याला एक उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. यावरून राज्यात सर्व काही अलबेल सुरू आहे असं म्हणता येत नाही. कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारत आहेत. तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले की मुख्यमंत्री येत नाहीत. याकडे देखील वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार की दुसराच चेहरा मुख्यमंत्री होणार, की शिंदे आपली खुर्ची टिकवण्यात यशस्वी होणार हे आगामी राजकीय घडामोडीत स्पष्ट होणार आहे.
अजित पवार मुख्यमंत्री शिंदेच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. महत्वाचे म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीतच अजित पवार यांनी ठाणे रूग्णालयात १८ रुग्णांच्या मृत्यूवरून शिंदेना जाब विचारला होता. त्यावेळी सारेच आवक झाले होते. त्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. अर्थात शिंदे गटाने सर्व अफवा असून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दावा केला आहे.