
माजी आमदार संग्राम थोपटे या तारखेला भाजपात प्रवेश करणार?
अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर भाजपा प्रवेशाचा निर्णय, अजित पवारांच्या अडचणी वाढणार?,काँग्रेस अस्तित्वहीन?
पुणे -विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर-मुळशी-वेल्हा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता आहे. ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यात आता संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केल्यास काँग्रेसची अवस्था बिकट होणार आहे. पुणे जिल्ह्यातील भोर-मुळशी वेल्हा हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिलेला आहे. हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांपासून थोपटे कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. कुठल्याही मतदार संघात काही होईल मात्र या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार, असा विश्वास काँग्रेस पक्षश्रेष्ठींना होता. मात्र २०२४ विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत अनपेक्षितपणे थोपटे यांचा पराभव केला होता. काँग्रेसची पार्श्वभूमी असतानाही थोपटे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दौंडचे आमदार राहूल कूल यांनी त्यांचे मन वळवल्याचे सांगण्यात येते. कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यामुळेच थोपटे यांनी तसा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आली सोमवारी म्हणजे २१ एप्रिलला ते भाजपात प्रवेश करणार आहेत. थोपटे यांच्या कारखान्यावर कर्ज आहे. त्यासाठी त्यांना सत्ताधारी पक्षात जाणे क्रमप्राप्त होते, त्यामुळे थोपटे आज ना उद्या भाजपात जाणारच होते. त्यामुळे त्यांचा निर्णय झाला आहे, मात्र ते प्रवेश करत नाहीत तोपर्यंत आमचेच आहेत’ असे सांगत काँग्रेसने देखील थोपटे यांना रोखण्याचे प्रयत्न थांबवल्याचे दिसत आहे. दरम्यान थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीनंतरच त्यांच्या पक्ष बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
संग्राम थोपटे यांचा भोर वेल्हा मुळशी हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुळे यांच्या विजयात थोपटे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे, त्यामुळे थोपटे यांच्या भाजपा प्रवेशामुळे सुळे यांच्या अडचणी वाढणार आहेत.