
भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेना सहभागी होणार?
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे विरोधक जोडो अभियान
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
‘भारत जोडो यात्रे’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतही पुढील आठवड्यात ‘भारत जोडो यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार आहे. तर शिवसेनाही या यात्रेत सहभागी व्हावी यासाठी चर्चा सुरु आहे.अशी चर्चा आहे. भारत जोडोच्या माध्यमातून विरोधक जोडो मोहिम राबवली जात आहे.
राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासुन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली आहे. या यात्रेची रंगीत तालीम म्हणून मुंबईतही मुंबई काँग्रेसच्या वतीने गांधी जयंतीला या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार आहे. तर यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार असल्याचे मुंबईतील एका कॉंग्रेस नेत्याने सांगितलं आहे. मात्र शिवसेनेकडून होकार आल्यास लवकरच याबाबत अंतिम घोषणा केली जाणार आहे. देशभरातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न लक्षात घेत कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रे’ला सुरुवात केली आहे.यात्रेला दक्षिणेत मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता, या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यात्रेच्या आयोजनाबाबत नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला अनेक संस्थांनी पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे.