
शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गटाकडून खरचं हायजॅक होणार?
दसरा मेळावा कोण घेणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याची उत्सुकता
मुंबई दि २७ (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील पक्षावरील दाव्यावरून संघर्ष टोकाला गेला आहे. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करुन ठाकरे सरकार पाडले. पण त्यांनी अनपेक्षितरित्या शिवसेनेवर दावा सांगितला. त्याचा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दरबारी पोहोचला आहे. पण त्याचबरोबर हा संघर्ष मैदानातही लढला जात आहे. आता या वादात शिवसेनेची ओळख आणि अस्मिता असणारा दसरा मेळावा आला आहे. राज्यातील राजकारण दसरा मेळाव्यावरुन चांगलेच तापले आहे.
शिवसेनेची दसरा मेळाव्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून या दसरा मेळाव्याची परंपरा आहे. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच दसरा मेळावा रद्द झालेला आहे. या मेळाव्यातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटत असत याच मेळाव्यात शिवसेनेची दिशा आणि धोरणे ठरवली जात होती. राज्यातूनच नाही तर देशभरातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवतीर्थावर येत असत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे संभाळल्यानंतरही ही परंपरा कायम राहीली.भारदस्त बाळासाहेब ते आजारपणामुळे थकलेले बाळासाहेब याच दसरा मेळाव्यात पहायला मिळाले उद्धवला संभाळा अदित्यला संभाळा ही भावनिक हाक बाळासाहेबांनी याच दसरा मेळाव्यातून दिली होती. पण आता हाच दसरा मेळावा खंडीत करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. मात्र, २२ आॅगस्टला अर्ज करूनही ठाकरे यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यातच शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन आम्हीच खरी शिवसेना असल्याचे दाखून देण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे. यासाठी त्यांना भाजपाकडून रसद पुरवली जात आहे.
या दसरा मेळाव्याबाबत आणि परवानगी बाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘दसरा मेळाव्याच्या परवानगी संदर्भात गृहमंत्री म्हणून एवढच सांगेल की जे नियमात असेल ते होईल. या सरकारमध्ये नियमाबाहेर जाऊन काहीच होणार नाही, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. मेळावा हायजॅक होणार का? यावर मात्र त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते असून ते मेळावा घेणार आहे की नाही किंवा उद्धव ठाकरे घेणार आहे की नाही याबद्दल मला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गट दसरा मेळावा साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे. तर शिंदे गटाचे आमदार सदा सारवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुण निर्णय घेऊ मी अजुन पत्र दिलेलं नाही अधिकारी माझ्या पत्राची वाट बघत आहेत म्हणुन त्यांनी शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही.अस सांगत उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून पडद्यामागे दसरा मेळाव्यासाठी हालचाली सुरु असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईचे आयुक्त चहल यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी पत्रावर लवकरात लवकर विचार करण्याची विनंती केली आहे.तर दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्यामागे राजकीय दबाव असल्याचं सूचक वक्तव्य शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.तर शिवसेना सोडलेल्या गद्दारांचा मुखवटा आता फाटलेला आहे. त्यांना दसरा मेळाव्याचे निमित्त पाहिजे होते; पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेनेचाच राहणार आहे.असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले आहे. मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांनी “दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार आणि महापालिकेला त्याबाबत भूमिका स्पष्ट करावीच लागेल” असे सांगत दसरा मेळावा ठाकरेंचाच असल्याचे सांगितले आहे.
आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत बंडखोर आमदारांविरोधात रणशिंग फुंकले होते. आता उद्धव ठाकरे गणेशोत्सवानंतर राज्यभरात महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभ करुन शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही सभा घेणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यातल्या टेंभी नाक्याजवळ उद्धव ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. गणेशोत्सवाची सांगता होताच उद्धव ठाकरे यांच्या ‘महाप्रबोधन यात्रे’चा श्रीगणेशा होणार आहे.या यात्रेचा समारोप दसरा मेळाव्यात करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. दसरा मेळाव्यात बोलणारे संजय राऊत तुरंगात आहेत तर रामदास कदम शिंदे गटात आहेत त्यामुळे शिवसेनेला परवानगी मिळाली तर उद्धव ठाकरेंशिवाय आणखी कोण बोलणार याची उत्सुकता असणार आहे.
एकनाथ शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्यास दसरा मेळाव्यात फक्त एकनाथ शिंदे भाषण करणार की फडणवीसही बोलणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण शिंदेचीच शिवसेना खरी अशी फडणवीस यांची ठाम भुमिका आहे. त्यामुळे शिवतीर्थावर कोणत्या गटाचा आवाज घुमणार यासाठी ५ आॅक्टोबरच्या दसरा मेळाव्याची वाट शिवसैनिकांना पहावी लागणार आहे. पण जर दोन्ही बाजुंनी दसरा मेळावा घेण्याची भुमिका घेतल्यास कोणाच्या मेळाव्याला प्रतिसाद भेटणार याची देखील उत्सुकता महाराष्ट्राला असणार आहे.