यंदा दुष्काळ पडणार?, स्कायमेट हवामान अंदाज सादर
अल निनोमुळे पावसावर होणार परिणाम, अवकाळीच्या चिंतेतील शेतकऱ्यांची अडचण वाढणार
मुंबई दि ११(प्रतिनिधी)- राजधानी मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कडाक्याच्या उन्हापासून सुटका झाली असली तरीही शेतकऱ्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. पण शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. कारण हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज जारी केला आहे.
सध्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी वर्ग कोलमडून पडला आहे, कारण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पण त्यामुळे यंदा पावसाळ्यात मात्र पुरेसा पाऊस पडतो की नाही? याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा ६ टक्के पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्याच नव्हे तर सर्वांच्याच अडचणी वाढवल्या आहेत. स्कायमेट या खासगी संस्थेकडून यंदाचा देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत केवळ ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर यंदा मान्सूनची सरासरी ६७ टक्के राहण्याची शक्यता आहे. अल निनो या हवामान प्रणालीमुळे यावर्षीचा मान्सून कमकुवत राहणार आहे. सामान्य पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज या संस्थेने व्यक्त केला असून यंदाच्या मान्सून मध्ये दीर्घ कालावधीत ९४ टक्के पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. तसेच या संस्थेने दुष्काळ पडण्याची शक्यता २० टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदासारखी परिस्थिती २००४ साली निर्माण झाली होती.त्यावेळी भारताला दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
स्कायमेट ही देशातील एक हवामान अंदाज वर्तवणारी खाजगी आणि प्रतिष्ठित संस्था आहे.आता स्कायमेटचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.पण या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.