मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय पटलावर सुरु झाली आहे. याला कारणीभूत ठरल आहे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेले सुचक विधान. पण कोणतीही महत्वाची निवडणूक आली की ही चर्चा नेहमीच होते पण दरवेळेस ती चर्चा चर्चाच राहते पण यंदाची होणारी चर्चा दोन्ही बाजूनी तितकीच महत्वाची आहे.
पुण्यात एक कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरेंनी मनसेला साद घातली तर येऊ देत, मग बघू.” शर्मिला ठाकरे यांच्या उत्तरावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले, “असा काही निर्णय घ्यायचा असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेण्यास सक्षम आहेत.अशी सावध प्रतिक्रिया दिली. सध्या राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेला नव्याने उभं करण्याचं आव्हान आहे. तर मनधरणी आणि भाजपाची युती एकनाथ शिंदेमुळे मागे पडली आहे. अशा वेळी मनसेलाही कुणाची तरी साथ हवीच आहे त्यामुळे ही युती अनेक अर्थाने महत्वाची ठरणार आहे. शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवायची आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरेंना यंदाची लढाई कठीण जाणार आहे. पण मनसेची साथ मिळाली तर शिवसेनेची ताकत वाढणार आहे. राज्यात कुठेही सत्ता नसली तरी चालेल पण मुंबई महापालिका आपल्याच ताब्यात हवी असा सेनेचा प्रयत्न कायम राहिला आहे. १९९७ पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण यंदा भाजपाने मुंबई जिंकायचीच असा पण केला आहे. सुरुवातीला भाजप मनसेसोबत युती करण्यासाठी उत्सुक होती. पण राजकीय पटलावर एकनाथ शिंदे यांचा उदय झाल्यामुळे भाजपाला आता मनसेची गरज राहिलेली नाही अशा वेळी मनसेलाही एखादा साथीदार हवाच आहे. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांचे विधान महत्वाचे आहे.
राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती त्यानंतर २००७ साली महापालिका निवडणूकीवेळी एकत्र येण्याची चर्चा झाली होती. पण दोन्हीबाजूंनी अधिकृत भुमिका जाहीर करण्यात आली नव्हती पण २००९ च्या निवडणूकीत मनसेमुळे शिवसेना भाजपाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे २०१२ च्या महापालिका निवडणुकीवेळी अधिकृत नेत्यामध्ये चर्चा झाली.पण त्याला अंतिम स्वरूप आले नव्हते. तर भाजपासोबत युती तुटल्यानंतर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे टाळीसाठी हात पुढे केला होता. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता ही गोष्ट राज यांनी जाहीरपणे सांगितली होती. दरवेळेस ही युती व्हावी म्हणून दोन्ही पक्षातील दुस-या फळीतील नेते युतीसाठी पोषक विधाने करतात पण वरिष्ठांकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही.
यंदाची राजकीय परिस्थिती अतिशय वेगळी आहे शिवसेनेपुढे अस्तित्वाचा प्रश्न आहे तर मनसेला आपले अस्तित्व सिद्घ करायचे आहे. कारण राज ठाकरे यांच्या सभेची गर्दी मतात परावर्तित करण्यात मनसे अपयशी ठरली आहे. कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची वानवा आहे. शिवसेनेकडे कार्यकर्ते आहेत. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तो गोंधळलेला आहे. त्यामुळे मनसेची साथ लाभल्यास त्यांनाही उभारी लाभू शकते. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक टिका करण्यात आली होती. तसेच कार्यकर्त्याकडूनही टिकाटिप्पणी करण्यात आली होती.त्यामुळे युतीबाबत सध्या तरी चर्चाच सुरु आहे.
राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्यामध्ये मनसेची अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. पण दरवेळेस टाळीसाठी मनसे पुढाकार घ्यायची पण बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे टाकीसाठी शिवसेनेने आधी पुढ यावे असे म्हणत मनसेने शिवसेनेकडे टाळीचा चेंडू टोलवताना शिवसेनेला गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. उद्धव ठाकरेकडून मनसेला तसा प्रस्ताव जाण्याची शक्यता कमी आहे. पण बदललेल्या परिस्थितीत ते याबाबत भुमिका घेऊ शकतात. पण त्यामुळे महाविकास आघाडीच काय याचीही चर्चा होत आहे राज ठाकरे यांनी पवार कुटुंबाला लक्ष्य केल्यामुळे शिवसेनेला पूर्ण विचार करुन घ्यावा लागणार आहे त्यामुळे उद्धव दादा राज ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात पुढे करणार का? हे आगामी राजकीय घडामोडीमधून समजणार आहे. पण नेहमीच येतो पावसाळा म्हणत चर्चा मात्र नेहमीप्रमाणे चालू झाली आहे.