Latest Marathi News
Ganesh J GIF

एकनाथ शिंदे अखेर माध्यमांसमोर…एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी – कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत. मात्र, त्यांच्याकडून अधिकृत असं वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. अखेर शिंदे यांनी साम टीव्हीशी बोलत असताना शिवसेना आमदार हिंदुत्वाशी फारकत घेऊ शकत नाहीत असं म्हटलं आहे. तसंच आपण शिवसेना  सोडली नाही आणि सोडणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर फारकत घेऊ शकत नाही. तसंच जे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे ते हिंदुत्व आणि तीच कडवट भूमिका घेऊन आपण या पुढील राजकारण समाजकारण करणार असल्याचंही शिंदे म्हणाले. शिवाय आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

शिवसेनेसह राज्यातील आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी आपला गुजरातमधील मुक्काम आता गुहावाटीला हलवला असून ते सध्या अज्ञात स्थळी दाखल झाले आहेत. शिवाय शिंदे यांनी आज दुपारी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी वेळ मागितला असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, आसाम विमानतळावरती बोलताना शिंदे यांनी माझ्यासोबत ४० आमदार असून इतर १० आमदारांचा पाठिंबा देखील मिळणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकारणात बरीच उलथापालत होणार असल्याचं दिसतं आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडी आणखी काही खेळी करणार याकडे राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!