
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे ८ खासदार मोदींना भेटले; अर्ध्या तासाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले असतानाच, आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात पक्षाच्या सर्व आठ खासदारांचा समावेश होता. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मोदींनी केली शरद पवारांची विचारपूस; म्हणाले…

सर्व खासदार पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी सुप्रिया सुळे यांच्याकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. तसेच, “शरद पवार यांच्या वयातील ऊर्जेचा (Energy) सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी शरद पवारांचे भरभरून कौतुक केले. यानंतर सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले.

महापुरुषांना ‘भारतरत्न’ अन् शेतकऱ्यांचे प्रश्न!
अर्धा तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत खासदारांनी काही प्रमुख मागण्या पंतप्रधानांसमोर ठेवल्या. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, शेतीपिकांचे कोसळलेले भाव आणि राज्यातील रखडलेले विकास प्रकल्प यावर विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी खासदारांचे सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत यावर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
राजकीय चर्चांना उधाण का आले?
या भेटीमागे राजकीय कारणे असल्याच्या चर्चांना उधाण येण्यामागे दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्र विमान प्रवास केला होता.गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट एनडीएमध्ये विलीन होणार किंवा लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणार, अशा चर्चा राजकीय कॉरिडॉरमध्ये रंगत आहेत.त्यातच आता थेट ८ खासदारांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट केवळ विकासकामांसाठी होती की यामागे काही मोठे राजकीय संकेत दडले आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

