‘माझ्याकडे प्रकरण येऊ द्या, १६ आमदार अपात्रच करेन’
विधानसभेचे उपाध्यक्ष थेटच बोलले, मुख्यमंत्री पदावरही मिश्किल प्रतिक्रिया
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकाल ११ किंवा १२ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा निकाल येण्या आधीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठे विधान केले आहे. माझ्याकडे त्या आमदारांचे प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन, असे नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.
न्यायालयाच्या निकालात हे प्रकरण विधानसभेकडे पाठवण्याची एक शक्यता आहे. ज्यावेळी हा संघर्ष सुरु होता. त्यावेळी नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते. तर अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे यावर न्यायालय झिरवळ यांना निर्णय घेण्यास सांगू शकते. त्या पार्श्वभूमीवर जर तुमच्याकडे आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार? असा सवाल झिरवळ यांना करण्यात आला. त्यावर येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असे नरहरी झिरवाळ म्हणाले. त्याचबरोबर विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असे होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असे म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. माझ्याकडे हे प्रकरण येईल की नाही हे कोण पक्कं सांगू शकते? कारण शेवटी कोर्ट कोर्ट आहे. हे प्रकरण महत्त्वाचे आहे हे सर्वच म्हणतात. तेव्हाही महत्वाचे होते. आजही त्याचे महत्व आहेच, असेही झिरवाळ यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री व्हाल का? हा प्रश्न राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. केलं तर मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो. पण त्यासाठी संख्याबळ हवं ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असं समजायचं. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.