चंद्रपूर दि १२(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काँग्रेसचे नेते आणि चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत हे गुरुवारी मूल येथील जिल्हा बँकेच्या शाखेत बसले होते. तेथून ते बाहेर पडताच हल्लेखोर मारुती स्विफ्ट डिझायर कारने तिथे पोहचले. कारमधून बुरखाधारी व्यक्ती बाहेर आला आणि त्याने संतोष रावत यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार झाला त्यावेळी संतोष रावत दुचाकीवर होते. या हल्ल्यातून रावत थोडक्यात बचावले असून या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रावत यांच्या समर्थकांनी घटनास्थळी चक्काजाम आंदोलन सुरू केले. रावत यांनी स्वतः पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करीत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. संतोष रावत यांच्यावरील झालेल्या गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गोळीबार करताना हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. गोळीबारात संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी गोळी त्यांच्या हाताला घासून गेली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
संतोष रावत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार संतोष थोटे यांनी निषेध केला आहे. चंद्रपूर जिल्हय़ाच्या सौहार्दपूर्ण सांस्कृतिक वैभववाला छेद देणारी ही घटना असून या भ्याड हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो. आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार सुभाष धोटे यांनी दिला आहे.