कोल्हापूरात सराफी दुकानात गोळीबार करत फिल्मी स्टाईल दरोडा
गोळीबारात दोघेजण जखमी, दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिक व्यापारावर्गात घबराट
कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- कोल्हापुरातील बालिंगा येथे भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. बालिंगा येथे बस स्टॉपजवळील मुख्य रस्त्यालगत असलेल्या कत्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी गोळीबार करत दरोडा टाकला. या गोळीबारात दुकानदार आणि सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. यात सुमारे दोन कोटींचे तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली आहे.
कोल्हापुरात करवीर तालुक्यातील बालिंगा येथील कोल्हापूर-गगनबावडा मुख्य मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मूळचे राजस्थान येथील माळी कुटुंबीय बालिंगा येथे स्थायिक झाले आहे. या कुटुंबियांचे कात्यायनी ज्वेलर्सचे दुकान आहे, हे दुकान बस स्टॉपपासून जवळच आहे. गुरुवारी दुकान मालक रमेश माळी, त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पियुष हे तिघे दुकानात होते. दुपारी दोनच्या सुमारास दुकानावर सराईत टोळीने भरदिवसा दरोडा घातला. सशस्त्र दरोडेखोरांनी सराफी पेढीच्या मालकासह त्यांच्या मेहुण्यावर अंदाधुंद गोळीबार करून दोन कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. यामध्ये तीन किलो सोन्याच्या तयार दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय १ लाख ५० हजारांची रोकडही लंपास केले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत मिळेल तेवढे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर कळेच्या दिशेने पसार झाले. यावेळी दरोडेखोरांसोबत झालेल्या झटापटीत रमेश माळी यांच्या पोटाला आणि पायाला गोळी लागली आहे. दागिन्यांची चोरी करुन बाहेर पडणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला रोखण्याचा प्रयत्न जितू माळी यांनी केला होता. मात्र दरोडेखोराने त्यांच्या डोक्यात काचेचा तुकडा मारला. डोक्याला मार लागल्याने तेही जखमी झाले. यावेळी पळून जाताना त्यांना काहींनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या दिशेनेही गोळीबार करण्यात आला. दरोडेखोरांपैकी एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते तर दुसऱ्याने रुमालाने आपला चेहरा झाकला होता. दरम्यान दोन्ही जखमींना तत्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून जितू माळी यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरोड्याचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना सांगली येथील रिलायन्स ज्वेलरी मॉल मध्ये घडली होती. येथे ही एका टोळीने दरोडा टाकत दहा कोटी पेक्षा अधिक किमतीचे दागिने लुटले होते. दरम्यान
सराफी दुकानाच्या परिसरात गोळीच्या दोन रिकाम्या पुंगळ्या पोलिसांना सापडल्या आहेत. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.