‘हर घर तिरंगा’ झाला पण ‘हर गाव अस्पताल’ कधी?
स्वातंत्र्यानंतरही अनेक गावांना भोगाव्या लागत आहेत मरणकळा
नाशिक दि १३ (प्रतिनिधी)- आपला देश आजपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हर घर तिरंगा सारखा उपक्रम या अमृतमहोत्सवानिनित्त राबवला जात आहे. पण हर गाव अस्पताल मात्र न झाल्याने आजही अनेक नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. हे स्वातंत्र्य खर स्वातंत्र्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारा प्रसंग नाशिक जिल्ह्यात घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथील वैशाली सोमनाथ बेंडकोळी यांना प्रसुतीच्या कळा सुरू झाल्याने तिला शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी नातलगांनी चिखलातून पायपीट करत चक्क तीन किलोमीटर झोळी करून तिला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने प्रसुती होऊन त्यांनी एका मुलीला जन्म दिला. पण या भागात उपचाराविना अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी देखील सर्पदंशाने एका युवतीचा मृत्यू झाला होता. तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत अहात पण अजून किती दिवस आम्ही अशा संकटांचा सामना करायचा असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावाजवळ मेटकावरा व हेदपाडा ही दोन गावे आहेत. ३०० लोकवस्ती असलेल्या हेदपाडा गावातील लोकांना दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची समस्या भेडसावते. या गावात जाण्यासाठी रस्ता मंजूर असतानाही नेहमी डांबरीकरणाऐवजी मातीचा रस्ता तयार केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होत असल्याने दुचाकी नेणेही मुश्किल होते. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत अंतराळात तिरंगा फडकवण्यासाठी यान पाठवत आहे पण अजूनही गाव खेड्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. एकीकडे महागड्या सुविधा तर एकीकडे मूलभूत सुविधांची वानवा हे चित्र ७५ वर्षानंतरही कायम असुन इंडिया आणि भारत यांची दरी अधिक गडद करणारे आहे.