अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यास भाजपाच्या या गटाचा विरोध?
अमित शहांसमोर केला विरोध, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा, नागपूरातून निर्णय होणार?
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या नंतर आता राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. पण त्यावर मोठी घडामोड आता समोर आली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार आणि भाजपा प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून वाटाघाटी करत होते. अजित पवार यांनी भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाची अट ठेवली होती. त्यामुळे भाजपमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवार यांना मुख्यमंत्री करायची की नाही हे भाजपमध्ये ठरत नव्हते. त्याचं कारण म्हणजे अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाला नितीन गडकरी यांच्या गटाचा आणि खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध होता, असं सांगतानाच अजितदादांना मुख्यमंत्री करायचे की नाही हा वाद अजूनही भाजपमध्ये सुरू आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला. तसेच सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर या सर्व प्रक्रियेला गती आली असेही चव्हाण म्हणाले आहेत. राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष सुरू होता. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडणार होती हे स्पष्टच होतं. या संघर्षातूनच शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता, असं सांगतानाच सुप्रिया सुळेंकडे पक्षाची जबाबदारी दिली तर अजित पवार सोडून जातील का याची चाचपणी शरद पवार यांनी केली होती. असा दावा देखील चव्हाण यांनी केला आहे. आता अमित शहा गडकरी आणि संघाची समजूत काढण्यात यशस्वी झाले आहेत का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत गेलेच नाहीत, तर त्यांचं डील ही मुख्यमंत्रीपदासाठी झाली असल्याचा दावा अनेक मोठ्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. पण यानंतर एकनाथ शिंदेच्या शिंदे गटाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.