कृषी मंत्र्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?
शेतकरी प्रश्नांवर सरकारचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम, सरकारची चुकीची माहिती
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, असा संताप प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
विधानसभेतील चर्चेत भाग घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, बियाणे व खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात आहे का? बँका कर्ज देत नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागते का? असे प्रश्न विचारण्यात आले असता, हे खरे नाही, असे धादांत खोटे व चुकीचे उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे. अनेक सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले नाही. बियाणे खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे. मंत्र्यांच्या नावाने धाडी टाकून व्यापाऱ्याकडून वसुली करण्यात आली, त्यावर सरकारने काय कारवाई केली, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.
राज्यात लाखोंच्या संख्येने बीएड, डीएड व सीईटी परिक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत. शिक्षक भरतीसाठी त्यांचा विचार करण्यापेक्षा सरकारने मात्र निवृत्त शिक्षकांना २० हजार रुपये मानधनावर नियुक्त करणार असल्याचा अफलातून जीआर काढला आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरात सरकारच्या या अन्यायी जीआर विरोधात तरुण मुले भर पावसात आंदोलन करत आहेत. राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे, भंडारा जिल्ह्यात फंडातून शाळा चालू ठेवावी लागली. सर्व सामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. या विषयाची सरकारने तातडीने दखल घ्यावी तसेच सरकारने या विषयावर निवेदन करावे, अशी मागणी पटोले यांनी केली.