१० हजारांची मदत तुटपुंजी, नुकसानीच्या प्रमाणात मदत करा
दुबार पेरणीसाठी बियाणे, खते व शेतीच्या डिझेलसाठी भरघोस मदत करा, गरिबांना घरकुल योजनेतून घरे द्या
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा अर्धा भागात अतिवृष्टीत बुडाला आहे आणि अर्ध्या भागात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सरकारने १० हजार रुपयांची मदत जाहीर केलेली आहे पण दुबार पेरणीसाठी बियाणे, खत, डिझेल लागते, पेरणीचा खर्च जास्त येते. त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात सरसकट मदत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, शेतकरी संकटात सापडलेला असताना सरकारने त्याला भरीव मदत करण्याची गरज आहे. पण सरकारने जाहीर केलेली मदत ही जखमेवर मीठ चोळणारी आहे. दुबार पेरणी केली तरी पीक येईलच याची शाश्वती नाही, पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे नुकसान झाले आहे. पावसाने नागपुरसह काही भागात गरिबांची घरे पडली आहेत तर काही घरे खचली आहेत. या गरिबांना घरकुल योजनेतून घरे दिली पाहिजेत. टपरी वाल्यांचेही मोठे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत देण्याची गरज आहे. पावसामुळे बेघर झालेल्या लोकांना कॅम्पमध्ये जाऊन सर्व मदत दिली पाहिजे. सरकारने तातडीने मदत करण्याची गरज आहे पण हे सरकार गरिब व शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. सरकारच्या घोषणा या सुद्धा पावसासारख्या भरघोस आहेत पण प्रत्यक्षात मदत मिळेपर्यंत काही खरे नाही. राज्यातील असंवैधानिक तिघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. सरकार अपयशी असते तेंव्हा मोर्चांचे प्रमाणही जास्त असते. भर पावसातही यावेळी शेकडो मोर्चे आले आहेत. माझ्या ३० वर्षांच्या कालावधीत पावसाळी अधिवेशनात एवढे मोर्चे कधी पाहिले नाहीत. असेही पटोले म्हणाले आहेत.
सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान व महिला बेपत्ता होणे दुर्दैवी आहे. राज्यातून १५ हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत पण त्याबद्दलही सरकार उत्तर देण्यास तयार नाही. शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दररोज महापुरुषांचा अपमान होत आहे पण सरकार काहीच करत नाही, असे चित्र असल्याचे नाना पटोले म्हणाले.