उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला धमकवणाऱ्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर
या अटी घालत न्यायालयाकडून जामीन मंजूर, उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला केले होते ब्लॅकमेल, पण..
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अनिल जयसिंघानीवर आणखी दोन गंभीर गुन्हे असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार नाही.
अमृता फडणवीस यांना खंडणीसाठी धमकावणे, ब्लॅकमेल प्रकरणी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा आणि भावास अटक करण्यात आली होती. जयसिंघानीची मुलगी आणि भावाला यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. या सर्व घटनेची सुरुवात २०२१ साली झाली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये अनिक्षाने आपण फॅशन डिझायनर असल्याचे सांगत अमृता फडणवीस यांच्याबरोबर मैत्री केली होती. ती अमृता फडणवीस यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये भेटण्यासाठी वारंवार जात होती. यानंतर अनिक्षाने अमृता यांना २० फेब्रुवारी रोजी ब्लॅकमेल केले होते. यासह लाचेची ऑफरही दिली होती. तसेच फोनवरून धमकावलेही होते. धमकावल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल जयसिंघानी हा यामागील सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात जयसिंघानीला १६ मार्चला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी विरोधात गुन्हेगारी कट रचणे, खंडणी मागणे यासाठी विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या अनिल जयसिंघानीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टात दररोज हजेरी लावणे, साक्षीदारांना न धमकावणे, अशा अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण अनिल जयसिंघानीवर इतर दोन गुन्हे दाखल असल्यामुळे त्याचा मुक्काम तुरूंगातच राहणार आहे.
क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे १५ हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क पोलीस तपासात उघड झालं आहे. त्याच्यावर ईडीने मनी लॉंड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. या प्रकरणी अनिल जयसिंघानी याची ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अनिक्षाला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली होती.