..तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू
आमदार अपात्रतेसंबंधात देवेंद्र फडणवीसांचे सुचक विधान, राज्यात राजकीय भूकंप होणार?, त्या आमदारांमध्ये अस्वस्थता?
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्लॅन बी’ची चाहुल देणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा थांबण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच लवकरच आमदार अपात्रतेसंबंधी निर्णय देणार आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे आणि १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यानंतर मुख्यमंत्री अजित पवार होणार की देवेंद्र फडणवीस होणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. पण आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच एक धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही. मात्र तशी कोणतीही कारवाई झाली तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू आणि त्यांच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन करू’, असे विधान केले आहे. तसेच त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढवली जाईल, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री शिंदेच राहतील असे महायुतीत ठरले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे खरेच अपात्र ठरणार का? की, शिंदेना विधान परिषदेवर संधी देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी आमदार अपात्रतेबाबत सल्ला घेण्यासाठी विधानसभा राहुल नार्वेकर हे महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन, असे नार्वेकर म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार आहेत. पण फक्त एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेवर संधी भेटणार असेल तर इतर आमदारांचे काय होणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण इतर आमदारांमध्ये शिंदे गटातील मंत्र्याचा समावेश आहे. त्यामुळे यावरून देखील महायुतीत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.