मराठा आरक्षणासाठी राज्यातील पहिल्या खासदाराचा राजीनामा
दोन दिवसांनी मराठा आरक्षणासाठी दिल्लीत करणार उपोषण, एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, मराठा समाज आक्रमक
हिंगोली दि २९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा जोर दिवसेंदिवस वाढता चालला आहे. मराठा आरक्षण मिळे पर्यंत अनेक राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आणि जे नेते आले, त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत राजकीय नेतेमंडळींवरही आता समाजाचा दबाव वाढलेला आहे. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यांचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.
हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदारकीचा राजीनामा देत असल्याचे कळवलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही. दरम्यान, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थिती समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेवून मी खासदारकीचा राजीनाना देत असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. हेमंत पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत. आणि शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे हेमंत पाटील यांच्या राजिनाम्यामुळे सरकारवर अधिक दडपण वाढले असून याबाबत राज्यातील सरकार काय पाऊले उचलते हे पाहणे महत्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे हेमंत पाटील शिवसेनेच्या तिकिटावर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.
जोपर्यंत मला बोलायला येते माझा आवाज आहे, तोपर्यंत चर्चेसाठी येण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी सरकारला केले आहे. त्यामुळे सरकार काय पाऊले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे सरकारची दुहेरी कोंडी झाली आहे. तसेच राज्यात उद्यापासून साखळी उपोषण केले जाणार आहे.