
पुण्यातील या भागात भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ
काही तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश, शहरात बिबट्याचा वावर वाढला
पुणे – बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
निगडी, प्राधिकरण, सेक्टर क्रमांक २४ येथील संत कबीर उद्यान परिसरात चक्क बिबटा वावरताना पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हा प्रकार रविवारी सकाळी अकराच्या सुमाऱ्यास समोर आला होता. बिबट्या दिसल्याची बातमी वा-यासारखी पसरल्यानंतर बिबट्या पाहण्यासाठी आणि त्याला मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसाचा मोठा फौज फाटा तेथे दाखल करण्यात आला होता. पाषाण येथील रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे अधिकारी प्राधिकरणामध्ये दाखल झाले. तोपर्यंत त्यांनी संबंधित जागेची पाहणी केली. तोपर्यंत या ठिकाणी महापालिकेचे अग्निशमन विभाग आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. यानंतर बचाव पथकाचे मोठया चपळाईने बिबट्याचा शोध घेऊन त्याला भुलीचे इंजेक्शन दिले. दोन तासाच्या आत बिबट्याला जेरबंद करण्यात आले. यानंतर बिबट्याची बिबट संवर्धन केंद्रामध्ये रवानगी करण्यात आली आहे. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान बिबट्या वावरतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. बिबट्या निरोगी नर असल्याचे आढळून आले आहे. बिबट्याची पूर्ण वाढ झाली आहे. हा बिबट्या दुर्गा टेकडीच्या आवारातून आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याआधीही सिहगड परिसर, बावधन, वाघोली आदी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे.
ऐरवी जंगलात राहणारा बिबट्या आता मानवी वस्तीत शिरू लागला आहे. निगडी प्राधिकरण येथे मोठ्या प्रमाणात झाडी आहेत. या ठिकाणी संत कबीर उद्यान आणि दुर्गा टेकडी परिसर आहे. त्यामुळे बिबट्या येथे आला असावा अशी शक्यता आहे.