
शिंदेनी ‘या’ राज्यातून केला ठाकरेचा करेक्ट कार्यक्रम
शिंदेची ताकत वाढत असताना ठाकरेंना मात्र धक्क्यावर धक्के
मुंबई दि १५ (प्रतिनिधी)- शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. पण मैदानात मात्र शिंदे आणि ठाकरे एकमेकांना धक्के प्रतिधक्के देत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाहेर जात उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांपाठोपाठ आता इतर राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. नुकतीच शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत शिंदे गटाला पाठिंबा दिला. यामध्ये जवळपास ८ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये दिल्ली, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार या राज्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये शिवसेना मागील काही वर्षांपासून पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे.त्यामुळे शिंदे गटाची ताकत वाढताना दिसत आहे. निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांना संघटनेत फूट दाखवणे गरजेचे आहे. अशावेळी बाहेरील राज्यातील प्रमुखांचा पाठिंबा मिळाल्याने शिंदे गटाची ताकत निश्चित वाढली आहे. तर ठाकरे यांना पक्ष वाचवण्यासाठी आता महाराष्ट्राबरोबर बाहेर देखील लक्ष द्यावे लागणार आहे.
सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाने सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर सुप्रीम कोर्टात २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.पण त्याआधी शह आणि काटशहाचे राजकारण जोरात चालू आहे.