Latest Marathi News
Ganesh J GIF

सावधान! पत्रकाराच्या नावाखाली ‘तो’ मागत होता खंडणी; गॅस सिलेंडर चालकाच्या तक्रारीनंतर भामट्याचं बिंग फुटलं

विमाननगर परिसरात गॅस सिलेंडर वाहतुकीदरम्यान कॅब चालकाला अडवून धमकावणे आणि स्वतःला पत्रकार तसेच राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांविरोधात कारवाई सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चांदणे (रा. विमाननगर) आणि सनी पठाण (रा. रामवाडी हौसिंग सोसायटी, विमाननगर) यांच्यावर जबरदस्तीने पैसे उकळण्याचा आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दिपक हरिभाऊ भवार (वय ५४, रा. पर्वती) हे कॅब चालक असून, ते स्वतःची व्हॅगनआर गाडी चालवून उदरनिर्वाह करतात. मागील पाच वर्षांपासून ते विमाननगर येथील ‘सांबर हॉटेल’साठी भाजीपाला आणि इतर साहित्य पुरवण्याचे काम करत आहेत.तक्रारीनुसार, शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास भवार हे हॉटेलमधील चार रिकामे गॅस सिलेंडर ‘प्रगती एजन्सी’कडे नेण्यासाठी गाडीत चढवत होते. त्याचवेळी दोन जणांनी रिक्षा आडवी लावून त्यांना अडवले.

या दोघांनी स्वतःला “पत्रकार आणि आरपीआयचे पदाधिकारी” असल्याचे सांगत, गाडीतून गॅस सिलेंडर नेणे बेकायदेशीर असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी भवार यांना शिवीगाळ करत दमदाटी केली आणि गाडी फोडण्याची धमकी दिली.तसेच, त्यांनी हॉटेलचे सुपरवायझर सुभाष यांना बाजूला बोलावून ५ हजार रुपयांची मागणी केली. सनी पठाण याने “मी पत्रकार असून आरपीआयचा उपाध्यक्ष आहे” असे सांगून दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर भवार यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!