
कंपनीच्या नाशिक कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त महिला असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांची स्वतंत्र ‘पॉश’ समिती असणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीने पुणे व नाशिक येथील कार्यालयांसाठी एकच समिती नेमली होती.

त्यातील सदस्य संशयित अश्विनी चैनानी ही नाशिक कार्यालयात दोन महिन्यांतून एकदा यायची. त्यावेळी पीडितांनी तिच्याकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, चैनानीने दुर्लक्ष केले होते. चैनानी या गुन्ह्यात संशयित असून, राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीने गंभीर दखल घेतली. स्वतंत्र समिती नसल्याने पीडितांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याची नोंद समितीने केल्याचे कळते. पोलिस तपासातही हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नातील विविध नऊपैकी सहा गुन्ह्यांत आतापर्यंत संशयितांना अटक झाली असून, उर्वरित तीन गुन्ह्यांत लवकरच अटकेची शक्यता आहे. संबंधित कंपनीच्या नाशिक कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त महिला कार्यरत होत्या. मात्र, तरीही पुणे व नाशिकसाठी कंपनीने एकच ‘पॉश’ समिती ठेवल्याने पीडितांच्या तक्रारींची अपेक्षित दखल घेण्यात आली नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

कंपनीतील प्रकरणांबाबत शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिसांत आठ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी आहे. त्यानुसार संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, शफी शेख, कंपनीची ‘असिस्टंट जनरल मॅनेजर’ अश्विनी चैनानी हे नाशिक रोड कारागृहात आहेत.
देवळाली कॅम्प पोलिसांतील बलात्कार, विनयभंग व धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात संशयित दानिश व तौसिफच्या जामीन अर्जावर २ मे रोजी सुनावणी होईल. त्याच गुन्ह्यातील संशयित निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २७ एप्रिलला सुनावणी होईल. मुंबई नाका पोलिसांतील १६४ व १६५ तसेच १६९ व १७१ या क्रमांकाच्या गुन्ह्यांत संशयितांचे नाशिक जिल्हा न्यायालयात अद्याप जामीन अर्ज दाखल झालेले नाहीत.

